मुंबई – काही दिवसांपूर्वीच महाविकासआघाडी सरकार स्थापन झालं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत तर त्यांच्यासोबत शिवसेना दोन, काँग्रेस दोन आणि राष्ट्रवादीतील दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अजूनही या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलं नाही. आज या मंत्र्यांना खातेवाटप केली जाण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाची दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार असून या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होऊ शकते. खातेवाटपात एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, जयंत पाटील, छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान 16 ते 21 डिसेंबर दरम्यान नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण अशक्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे देखील हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात इच्छुक नसल्याची माहिती आहे. खातेवाटपासंबंधी अद्यापही शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चर्चा झालेली नाही. त्यामुळे ही चर्चा होऊन त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे.
तसेच महाविकास आघाडीचा मंत्रिपदाच्या वाटपाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार शिवसेनेला 16 मंत्रिपद, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेनकडून एकनाथ शिंदे, दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.
तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे यांची वर्णी लागू शकते.
तसेच काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी,अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील आणि सुनील केदार यांची वर्णी लागू शकते.
COMMENTS