“मी जगेन असं वाटत नव्हतं, पण आज मी मंत्री झालो! “

“मी जगेन असं वाटत नव्हतं, पण आज मी मंत्री झालो! “

मुंबई – मी जगेन असं मला वाट नव्हतं परंतु आज मी सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा मंत्री झालो असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये काल भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मी जगेन की नाही मला वाटत नव्हते. पण मी सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो. मला विश्वास बसत नाही. तसंच जे माझ्यासोबत झाले ते मी कधीच विसरलो नाही. परंतु मी कोणासोबतही सुडबुद्धीचं राजकारण करणार नसल्याचं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आपल्या नव्या कारकिर्दीला सुरूवात केली. उद्धव ठाकरे यांच्यासह काल सात मंत्र्यांनी शपथ घेतली. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, नितीन राऊत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुढील दोन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.

COMMENTS