युतीची घोषणा होताच अनेक इच्छुकांमध्ये नाराजी सूर असतानाच माहीममध्ये मात्र खरोखर युतीचे चित्र!

युतीची घोषणा होताच अनेक इच्छुकांमध्ये नाराजी सूर असतानाच माहीममध्ये मात्र खरोखर युतीचे चित्र!

मुंबई – भाजपा-शिसेनेमध्ये झालेल्या युतीनंतर अनेक ठिकाणांहून दोन्ही पक्षातील इच्छुकांचे नाराजीचे सूर उमटत आहेत. पण माहीममध्ये मात्र खरोखरच्या युतीचं चित्र पाहायला मिळत आहे. युतीनंतर ही जागा शिवसेनेला सुटली आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर युतीचे उमेदवार म्हणून घोषित झाले. अर्थात युती झाली नसती तर सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाकडून सचिन शिंदे यांना उमेदवारी निश्चित होती.

सचिन शिंदे यांनी केलेल्या कामामुळे गेल्या काही वर्षात माहीममध्ये भाजपाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात जाणवू लागले होते. मागच्या निवडणुकीत माहीममध्ये भाजपाला मोदी लाटेत जवळपास ३४ हजारांहून अधिक मतं पडली होती. आणि याखेपेस तर सेना-भाजपात थेट लढत झाली असती. आणि हा सामना अटीतटीचा झाला असता. पण युती घोषित झाल्यामुळे ही चुरस संपली.

युती घोषित होताच शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी सचिन शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी माहीम भाजपाचे अनेक पदाथिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी सचिन शिंदे यांनी सरवणकर यांचे स्वागत मोदींची प्रतिमा देऊन केले. युती झाल्यामुळे आता माहीममधील सामना तिरंगी न होता मनसे आणि शिवसेना यांच्यात होईल. पण सचिन शिंदे यांची भेट घेऊन एकप्रकारे सरवणकर यांनी निवडणुकीआधीच आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले आहे.

COMMENTS