नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमध्ये एका ऑडिओ क्लिपमुळे सध्या राजकीय वातावरणात जोरदार खळबळ माजली आहे. भाजप नेत्यांशी डील कर नाहीतर तुझा एन्काऊंटर करु अशी ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. झांसी येथे एका कुख्यात गुन्हेगार आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये हे संभाषण झालं आहे. या संभाषणामुळे पोलीस-गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांमधील साटेलोटे समोर आलं आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये झासी येथील मऊरानीपूर ठाण्याचा प्रभारी सुनीतकुमार सिंह आणि कुख्यात गुंड आणि माजी ब्लॉक प्रमुख लेखराज यांच्यातील हे संभाषण आहे. सुनीतकुमारने लेखराजला त्याचा एनकाऊंटर केला जाणार असल्याची धमकी दिली आहे. आपण अनेक गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. लवकरच तुझीही वेळ येईल, असे सांगत तुला यातून वाचायचं असेल तर भाजपाच्या नेत्यांना मॅनेज कर असा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. तसेच लेखराज सिंहवर दरोडा, लूट आणि खूनाचे ७० हून अधिक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान, राजीव सिंह परिच्छा आणि संजय दुबे यांनी मात्र गँगस्टर आणि एनकाऊंटरशी आपला काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये लेखराज सुनीतकुमारला मदतीची याचना करत आहे. त्यावेळी सुनीतकुमार त्याला म्हणाला की, माझा नाईलाज समजून घे. मी तुला सांगितलं आहे की जिल्हाध्यक्ष संजय दुबे आणि राजीव सिंह परिच्छा या दोन माणसांना तू मॅनेज कर. तसेच परिच्छा म्हणाले, सुनीतसिंहला माहीत होतं की, मी गुन्हेगारांशी बोलत नाही. त्यामुळे त्याला खात्री होती की, लेखराज माझ्याकडे येणार नाही. सुनीतला त्याच्याकडून पैसे उकळवायचे होते. त्यामुळे त्याने माझं नाव वापरलं ते म्हणाले आहेत. याबाबतची बातमी इंडिय एस्कप्रेस या वृत्तपत्रानं दिली आहे.
COMMENTS