पंतप्रधान मोदींवर टीका करणा-या पत्रकाराला एका वर्षाची पोलीस कोठडी !

पंतप्रधान मोदींवर टीका करणा-या पत्रकाराला एका वर्षाची पोलीस कोठडी !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणा-या पत्रकाराला एका वर्षाची पोलीस कोठडीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मणिपूरमधील पत्रकार किशोरचंद्र वांगखेम असे या पत्रकाराचे नाव असून, त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासुका) एका वर्षासाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या पत्रकाराचा इतिहास बघता, तो पुन्हा आक्षेपार्ह वर्तणूक करेल आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्यास कारणीभूत होईल, त्यामुळे रासुका कायद्याच्या 13व्या कलमाअंतर्गत त्यांना बारा महिन्यांपर्यंत शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, किशोरचंद्र वांगखेम (वय 39) यांनी फेसबुकवर एका व्हिडीओच्या माध्यमातून मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

किशोरचंद्र वांगखेम यांना 21 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी पश्चिम इंफाळमधील न्यायालयाने त्यांना 70 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला होता. जामीन देताना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असेही स्पष्ट केले होते. परंतु, ही सुटका झाल्यानंतर रासुकाच्या सल्लागार मंडळाने किशोरचंद्र यांना पुन्हा एका वर्षासाठी ताब्यात घेण्यावर शिक्कामोर्तब केले.

भारतीय पत्रकार संघ आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाने किशोरचंद्र यांच्या अटकेचा निषेध केला आहे. रासुका हा कायदा अत्यंत मागास असून अन्यायकारक असल्याचे मत यापूर्वीही अनेक सामाजिक संस्थांनी व्यक्त केले आहे. किशोरचंद्र यांचे कुटुंबीय त्यांच्या शिक्षेला आव्हान देण्याची शक्यता आहे.

COMMENTS