मुंबई – शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आज मुंबईत राज्यव्यापी शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात बोलत असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी पक्षालाच आरसा दाखवला आहे. इतर राज्यात तिथल्या प्रादेशिक पक्षांना जे जमलं ते महाराष्ट्रात शिवसेनेला अजून का जमलं नाही ? असा सवाल मनोहर जोशी यांनी केला आहे. शिवसेनेला महाराष्ट्रात पूर्ण सत्ता का मिळाली नाही याचा अभ्यास झाला पाहिजे. काही पक्ष स्थापन झाल्यावर अल्पावधीत सत्तेत आले आहेत. पण शिवसेना पूर्ण सत्तेत का आली नाही ? याचा अभ्यास केला पाहिजे असं मनोहर जोशी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, दक्षिणेत डिएमके-एआयडिके तर उत्तर प्रदेशात मुलायम सिंह यांची समाजवादी पार्टी, कांशीराम यांचा पक्ष सत्तेत आला. त्यामुळे इतर राज्यात प्रादेशिक पक्ष सत्तेत येतात, महाराष्ट्र शिवसेना सत्तेत का आली नाही ? असं जोशी यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेने घोषणा केल्या, प्रयत्न उत्तम केले, उत्तम नेतृत्व आहे तरीही सत्तेत आले नाही ?, तसेच आपण सत्तेत आलो तेव्हा सेना भाजप सत्तेत होती. ज्या दिवशी कार्यकर्त्यांची पक्षाला वाहून घेण्याची वृती होते, तेव्हा तो पक्ष सत्तेत येतो असंही यावेळी जोशी यांनी म्हटलं आहे. तसेच शिवसेनेतील सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी इतर पक्षांचा अभ्यास करायला हवा ते सत्तेत कसे आले. जर दृढ निष्ठा, निर्धार केला तर आपल्यापासून सत्ता दूर नाही असा विश्वासही यावेळी जोशी यांनी व्यक्त केला आहे.
तसेच सत्ता मिळवण्यात आपण कमी पडतोय. कशात कमी पडतोय ते शोधुया. ती उणीव भरून काढूयात. मतदारला आपल्या पक्षाखेरीज खेरीज दुसरं काही दिसता कामा नये. इतकी एकाग्रता असायला हवी. सत्ता हवी असेल तर नेता चांगला लागतो. मी बाळासाहेबांसोबत काम केलं आहे. तसेच शिवसैनिक उत्तम कार्यकर्ता आहे पण दोष दूर झाले पाहिजेत. महाराष्ट्रात राहायचं पण मराठी माणसाची एकजूट करायची नाही असं कसं होईल ? मुंबईत मराठी एकजूट, पण महाराष्ट्रात ती दिसत नाही त्यामुळे एकजुटीसाठी प्रयत्न करा असं मंत्रही यावेळी मनोहर जोशी यांनी दिला आहे.
दरम्यान मुंबईत शिवसेना आहे, पण शिवसेना महाराष्ट्राच्या अनेक भागात अजून पोहचू शकली नाही. ही ताकद आणण्यासाठी मानसिकता पाहिजे. आजही आपण सर्व मराठी माणसाचे संरक्षण करू शकत नाही कारण आपल्या हातात सत्ता नाही. हे शिबीर अभ्यासाचा वर्ग असून जातीपात मनापासून गाडा ही बाळासाहेबांची शिकवण आपण मनापासून ऐकणार आहोत का ? असा सवालही यावेळी जोशी यांनी केला आहे.
COMMENTS