उस्मानाबाद – शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर एक तरुण चढला आहे आणि तो आत्महत्येची धमकी देत आहे ही बातमी सकाळीकडे वा-यासारखी पसरली. सर्व चॅनलनी ती बातमी व्हिज्युल्ससह चालवली. नंतर मंत्री आणि तिथल्या अधिका-यांनी त्या तरुणाची समजूत काढली आणि त्याला खाली उतरविले. त्याला कृषीमंत्र्यांना भेटायचं होतं आणि शेतमालाला रास्त भाव हवा अशी त्याची मागणी होती असं त्यानं पोलिसांना फोनवर सांगितली ही सर्व स्टोरी तम्हाला माहित आहेच. तो तरुण तुळजापूर तालुक्यातील असल्याचं समजलं. महापॉलिटिक्सनं त्या तरुणाच्या गावातील नागरिकांशी चर्चा करुन तो तरुण नेमका कोण आहे ? त्यानं असं टोकाचं पाऊल का उचललं ? त्याच्या घरची स्थिती कशी आहे ? याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला.
ज्ञानेश्वर साळवे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द या गावचा राहणारा आहे. घरी आई वडील आणि बहिण, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर आहे. आर्थिक स्थिती बेताचीच आहे. ज्ञानेश्वर 12 वी पास झालेला आहे. शेतातल्या तुटपुंजा उत्पन्नावर घर चालवणं शक्य नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी तो नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता. त्याला पुण्यात नोकरी मिळाली की नाही हे आम्हाला समजू शकलं नाही. शेतात त्याला यंदा 19 पोती सोयाबीन झालं. मात्र त्याला भाव नाही. या आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
ज्ञानेश्वरने केलेल्या कृत्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. त्याने त्याच्या मागण्या कायद्याच्या चौकटीत राहूनच करायला हव्या आहेत. असं कोणीही करता कामा नये. मात्र सरकारनेही ज्ञानेश्वरला समजून घेतले पाहिजे. त्याने खरंच असं पाऊल का टाकलं ? याचाही कुठेतरी विचार व्हायला हवा. सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी ज्ञानेश्वरला वेडं ठरवू नये, किंवा त्याला कुठल्या पक्षाचा कार्यकर्ताही ठरवू नये. जरी तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असला तरीही, कारण त्याने कार्यकर्ता म्हणून असे टोकाचे पाऊल उचललेले नाही. घरची एवढी हालाखीची स्थिती असताना कुठल्या पक्षासाठी आपले साधेभोळे आईवडील सोडून तो असे जीवावर बेतणारे प्रकार करणार नाही. त्याच्या घरची स्थिती पाहिल्यानंतर तरी नक्की तसेच वाटते !
COMMENTS