मुंबई – मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही न झाल्याने उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी 7 जुलैला होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटना आक्रमक झाली असून संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
तसेच उपसमितीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील किंवा एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष म्हणून निवडावे. यामुळे मराठा समाज्या मागण्या मान्य करुन घेण्यास मदत होईल असंही केरे म्हणाले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र देऊन त्यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान या पत्रात रमेश केरे यांनी मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाज हितासाठी आजपर्यंत या समितीची एकही बैठक घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू मांडण्यासाठी एकाही नामवंत वकिलाची नियुक्ती केलेली नाही. त्यांनी लवकरात लवकर बैठक बोलावून मराठा हितासाठी काय निर्णय घेतले याची माहिती द्यावी. अन्यथा त्यांची समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
COMMENTS