पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची घोषणा !

पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची घोषणा !

कोल्हापूर – पाडव्याच्या मुहूर्तावर मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची घोषणा करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी राजकीय पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय मराठा समाजानं घेतला असून ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या नावानं पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी पक्षस्थापन करण्यासंदर्भात सप्टेंबर महिन्यात मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात राजकीय पक्षाची स्थापना करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. यानुसार आज या पक्षाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान पक्ष स्थापनेस मराठा समाजातील काही लोकांनी विरोध केला होता. या विरोधाला डावलून पक्षाची स्थापना करण्यात आली असून साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांनी या पक्षाला पाठिंबा दर्शवला आहे. पक्षाच्या घोषणेनंतर मराठा समाजातील हजारो तरुण रायरेश्वर गडावर पोहोचले आहेत.

‘मराठा समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून अन्याय झाला असून या मराठा समाजाला न्याय मिळवून देऊ’, असे सुरेश पाटील यांनी म्हटले आहे. ‘मराठा क्रांती मोर्चातील काही लोकांचा पक्षाच्या नावावर आक्षेप होता. मराठा क्रांती मोर्चा असे नाव देऊ नये अशी त्यांची भूमिका होती. यानुसार आम्ही पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांती सेना असे ठेवलं असल्याचंही सुरेश पाटील यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS