मुंबई – मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल उद्या सादर करण्यात येणार आहे. मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल सकारात्मक असल्याची माहिती एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिली आहे. तसेच या अहवालातील गुणांत्मक बाबी देखील समोर आल्या आहेत. यामध्ये शैक्षणिक गुण 8 पैकी 8 गुण देण्यात आले आहेत. तर सामाजिक क्षेत्रात 10 पैकी 7.5 गुण या अहवालात देण्यात आले आहेत. तसेच आर्थिक मागासलेपणात 8 पैकी 6 गुण देण्यात आले असल्याची शक्यता एबीपी माझाने वर्तवली आहे.
मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांची प्रतिक्रिया
मागासवर्ग आयोगाचा अहवाल अनुकूल असेल तर मराठा समाजाला आरक्षण देण्यात कोणतीही कायदेशीर अडचण नसून जर सरकारने यावेळी आरक्षण दिले नाही तर 32 टक्के मराठा समाजाचा रोष येऊ शकतो अशी प्रतिक्रिया खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. तसेच आरक्षण दिले नाही तर मी मराठ्यांच्या बाजूने असणार असल्याचंही यावेळी राणे यांनी म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने 16 टक्के आरक्षण दिले होते, मात्र त्याला न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यावेळी सरकारने न्यायालयात योग्य बाजू मांडली नव्हती. तसेच मी दिलेल्या राणे समितीचा अहवालाबाबत सरकारने तेव्हा न्यायालयात सविस्तर प्रतिज्ञापत्र दिले नव्हते असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS