मराठा आरक्षण प्रकरणावर आज मुंबईत 4 महत्वाच्या राजकीय बैठका !

मराठा आरक्षण प्रकरणावर आज मुंबईत 4 महत्वाच्या राजकीय बैठका !

मुंबई – मराठा आरक्षण प्रकरणावर आज मुंबईत चार महत्वाच्या राजकीय बैठका होत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची आज महत्वपूर्ण बैठक विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे. दोन्ही पक्षांच्या स्वतंत्र्य बैठका झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची याच प्रश्नावर संयुक्त बैठक होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी सरकारवर कसा दबाब वाढवावा याची रणनिती या बैठकीमध्ये ठरणार आहे.

दुसरीकडे आजपर्यंत राज्यपातळीवर फारसे सक्रीय नसलेली शिवसेनाही आजपासून बैठकीचं सत्र सुरू करत आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होईल. या बैठकीमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावर उद्धव ठाकरे आमदारांची मते जाणून घेणार आहेत. काल लातूरमध्ये मराठा समन्वयकांची महत्वपूर्ण बैठक झाली. सरकारकडे यापूर्वीच मागण्या दिल्या आहेत. त्यामुळे यापुढे सरकारसोबत कसलीही चर्चा करणार नाही अशी भूमिका मराठा संघटनांनी घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर या तीन राजकीय पक्षांची काय रणनिती ठरते त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS