मुंबई – मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यात अजूनही काही ठिकाणी बंद पुकारण्यात येत आहे. आज नंदुरबार आणि सोलापुर जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. नंदुरबार तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने नंदुरबार शहरसह तालुका बंद ठेवण्यात आला होता. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. दरम्यान आज शहरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच नंदूरबार बंदच्या पार्श्वभूमीवर नंदूरबार आगाराची बस सेवाही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत.
दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन सोलापूरमध्येही बंद पाळण्यात आला होता. या बंदला सोलापुरातील जनतेनं चांगला प्रतिसाद दिला असून बाजारपेठा बंद होत्या तर शाळेला अघोषित सुट्टी देण्यात आली होती. तसेच पालिका परिवहन सेवाही ठप्प करण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशूकाट पहायला मिळाला. तसेच सोलापूर माढा तहसील कार्यालयावर बैलगाडी घेवून आंदोलन करण्यात आले. त्यामुळे काही काळ याठिकाणी तणावाचे वातावरण पहावयास मिळाले.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड, हिंजवडीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा आणि आंदोलन काढण्यात आले.तसेच बीडमध्येही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली होती.
COMMENTS