पंढरपूर – मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. राज्यभरात अभूतपूर्व असे मूक मोर्चे काढूनही त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळेच आता मूक नव्हे तर ठोक आंदोलन होईल असा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे. कालच पंढरपूरमध्ये मराठा समाजाची पत्रकार परिषद झाली. आरक्षणाबाबत काही निर्णय झाला नाही तर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पूजेसाठी येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आज (बुधवारी) संध्याकाळच्या सुमारास मराठा समाजातील तरुणांनी पंढरपूरमध्ये एस टी बस फोडली.
पंढरपूर-सांगोला रस्त्यावर पंढरपूरमधून तपकीर शेटफळला जाणाली मुक्कामी एस.टी. बस क्रमांक एम एच १२ ईएफ ६५१० ही महावितरण कार्यालयाजवळ आली असताना दबा धरून बसलेल्या पाच ते सहा तरुणांनी एसटीवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटल्या असून बसमधील चारजण जखमी झाले आहेत. घटनास्थळावर तरुणांनी ‘ये तो सिर्फ झाकी है मुख्यमंत्री की पूजा बाकी है, पूजा होऊ देणार नाही’ अशी पत्रके टाकलेली आढळून आली आहेत.
COMMENTS