मराठा आंदोलनाचा पहिला बळी, नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या !

मराठा आंदोलनाचा पहिला बळी, नदीत उडी घेऊन तरुणाची आत्महत्या !

औरंगाबाद – आरक्षणाच्या मागणीवरुन सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा पहिला बळी गेला आहे. औरंगाबादमधील एका तरुणानं आरक्षणाच्या मागणीवरुन आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कायगाव टोक येथे एका तरुणाने पुलावरुन नदीत उडी घेऊन ही आत्महत्या केली आहे. काकासाहेब दत्तात्रय शिंदे असं या तरुणाचे नाव असून त्याला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्याचा  मृत्यू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलकांनी केली असून तोपर्यंत या तरुणाचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आरक्षणाच्य मागणीवरुन काकासाहेब शिंदे या तरुणानं आंदोलनात सहभाग घेतला होता. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अन्यथा जलसमाधी घेऊ, असे त्याने उडी मारण्यापूर्वी म्हटले होते. त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत आज दुपारी  कायगाव टोक येथील नदीवरील पुलावरुन उडी मारली. यावेळी स्थानिक पोलिसांनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आंदोलकांनी जलसमाधीसारखे आंदोलन करु नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आंदोलन सुरुच असून उस्मानाबादमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भर पावसात ठिय्या आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी स्वयंवर मंगल कार्यालयात मराठा समाजाची बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.

 

COMMENTS