मुंबई – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने सतत दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यातील प्रमुख नद्यांमध्ये वळविण्यात यावे या उद्दिष्टाने काल राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील सर्व मंत्री, आमदार व लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली.
मराठवाडा हा सतत कमी पाऊस व दुष्काळ सोसणारा भाग आहे, त्यामुळे काही प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्या तील सिंदफना, वाण, सरस्वती, गुणवती, बोरणा, मनार,लेंडी व मांजरा या महत्त्वाच्या नद्यांमध्ये वळविण्यात यावे या साठी विशेष अभ्यास प्रकल्पाचे सादरीकरण या बैठकीत जयंत पाटील यांच्या सूचनेवरून करण्यात आले.
या बैठकीस मराठवाड्यातील सा. बा. मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मंत्री राजेश टोपे, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, राज्य मंत्री संजय बनसोडे, आ. प्रकाश सोळंके, आ. विनायक मेटे, आ. सतिष चव्हाण, आ. धीरज देशमुख, आ.बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, यांसह मराठवाड्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
मराठवाडा हा अनिश्चित पावसाचा प्रदेश आहे, इथली धरणे भरायला पाच वर्षे लागतात, कायम दुष्काळ असतो. मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याचा महाविकासआघाडीचा मानस आहे. त्यासाठीच मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींसह ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. मराठवाड्याला जास्त पाणी उपलब्ध व्हावं यासाठी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. पश्चिम वहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबाबतच्या प्रकल्पबाबत अधिक अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
COMMENTS