मुंबई – फेसबुकच्या सुमारे पाच कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी फेसबुक काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. अखेर फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने एक पोस्ट शेअर करत डेटा लीकवर स्पष्टीकरण दिलं आहे.’युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. युजर्सचा डेटा सुरक्षित ठेण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलू’ असं झुकरबर्ग यांनी म्हटलं असून भारतातील आगामी निवडणुकीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 2019 च्या निवडणुकी अगोदर कोणत्याही प्रकारचा डेटा लीक होणार नाही अशी ग्वाही झुकरबर्ग यांनी दिली आहे.
दरम्यान फेसबुकच्या पाच कोटी युजर्सचा डेटा हाती आल्याचा दावा केंब्रिज अॅनालिटिका कंपनीने शुक्रवारी केला होता. त्यानंतर फेसबुक युजर्सच्या डेटा लीक प्रकरणी मौन सोडत सीईओ मार्क झकेरबर्गने चूक कबुल केली आहे. यासोबतच युजर्सच्या खासगी बाबी अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी काही पावलं उचलणार असल्याची ग्वाहीही झुकरबर्ग यांनी दिली आहे. तसेच अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे. त्यामुळे लाखो लोकांनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे. तसेच सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे.
COMMENTS