शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर निर्णय घेतल्यानंतर भाजपने प्रत्येक लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्यामुळे इथून भाजपने कधीही उमेदवार दिला नाही. यावेळी मात्र भाजपला उमेदवार शोधावा लागणार आहे. तसं पाहिलं तर मतदारसंघात भाजपची ताकद ब-यापैकी आहे. मात्र उमेदवार कोण असावा याबाबत पक्षात खलबंत सुरू आहेत. चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघात चर्चा सुरू आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातले विधानसभेचे 3 आणि रायगड जिल्ह्यातील विधानसभेचे 3 मतदारसंघ येतात. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे चिंचवडचे आहेत. तसंच राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवारही पिंपरी –चिंचवडमधीलच असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथले दोन उमेदवार होतील. त्यामुळे चिंचवडमधील लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी देण्याऐवजी रायगड जिल्ह्यातील पनवेलचे असलेल्या माजी खासदार रामशेठ ठाकूर यांना उमेदवारी देण्याचा भाजप श्रेष्ठींचा विचार असल्याची चर्चा आहे. जातीची समिकरणे आणि आर्थिक गणीत यामुळे रामशेठ ठाकूर यांनी पक्षातर्फे लोकसभा निव़डणूक लढवण्यासाठी विचारणा केली जात असल्याची चर्चा आहे.
रामशेठ ठाकूर यांनी यापूर्वी शेतकरी कामगार पक्षात असताना पुन्हा लोकसभा लढवण्यास नकार दिला होता. दिल्लीतील वातावरण आपल्याला तब्बेतीला सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर रामशेठ पुन्हा लोकसभा लढतील का याबाबत साशंकता आहे. त्यातच हा मतदारसंघ भाजपसाठी काही प्रमाणात सोपा वाटत असला तरी सहज जिंकून येईल अशीही स्थिती नाही. काँग्रेस राष्ट्रवादीला शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली आणि ती मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि शिवसेना वेगळी लढणं हे भाजपच्या उमेदवारासाठी अडचणीचं ठरू शकते. मोदी लाट कमी होणे, सरकारविरोधातील नाराजी याचाही काही फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळेच एकीकडे तब्बेतीचे कारण आणि प्रबळ विरोधक यामुळे श्रेष्ठींचा आग्रह रामशेठ मानणार का ? याचीची चर्चा सध्या मावळ मतदारसंघात सुरू आहे.
COMMENTS