लखनऊ – आगामी निवडणुकांमध्ये भाजपच्या हातातून सत्ता खेचून घेण्यासाठी सर्वच विरोधक एकवटत असल्याचं दिसून येत आहे. याचीच प्रचिती विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये पहायला मिळाली आहे. उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनं एकत्र येत भाजपाला धूळ चारली. आगामी निवडणुकांमध्येही सर्व विरोधी पक्षांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याचा डाव काँग्रेसचा आहे. परंतु उत्तर प्रेदशात मात्र विरोधकांच्या या एकजुटीला ग्रहण लागण्याची शक्यता आहे. बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती 40 लढवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीला सुरुंग लागू शकतो.
दरम्यान कैराना आणि नुरपूरमध्ये विरोधकांनी भाजपाचा पराभव केल्यावर समाजवादी पक्षानं मोठा जल्लोष केला. मात्र या विजयानंतर मायावतींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे मायावती यांचं हे मौन अतिशय सूचक मानलं जात असून बसपाला लोकसभा निवडणुकीत 80 पैकी 40 जागा हव्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे मायावतीची ही अट इतर काँग्रेस आणि समाजवादी पार्टी मान्य करणार का याकडे लक्ष लागलं आहे. जर मान्य केलं नाही तर उत्तर प्रदेशात वेगळं चित्र पहायला मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे सपा आणि काँग्रेसच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS