हिंमत असेल तर मला सरकारमधून हाकला, मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान !

हिंमत असेल तर मला सरकारमधून हाकला, मंत्र्याचं मुख्यमंत्र्यांना आव्हान !

नवी दिल्ली – तुमच्यामध्ये हिंमत असेल तर मला सरकारमधून हाकला असं आव्हान भाजप मंत्र्यांनं मुख्यमंत्र्यांना केलं आहे. उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आणि  मंत्रिमंडळातील मागासवर्ग कल्याणमंत्री ओमप्रकाश राजभर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना हे आव्हान केलं आहे. ते आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात बोलत होते. मित्रपक्षाला बेदखल करून टाकण्याच्या भाजपच्या धोरणाविरोधात ओमप्रकाश राजभर यांनी आवाज उठवला असून आज त्यांनी योगी आदित्यनाथ यांना खुलं आव्हान केलं आहे.

दरम्यान भाजपला वाटत असेल की आपणास ते कधीही योगी सरकारमधून हाकलण्यास मोकळे आहेत, परंतु तेवढे धैर्य त्यांच्यात नसल्याचंही राजभर यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फक्त भाजपच्याच मंत्र्यांचे म्हणणे ऐकून घेत असून आपल्या पक्षाकडे साफ दुर्लक्ष करत आहेत असा आरोपही राजभर यांनी यावेळी केला आहे. भाजप ‘आघाडी’चा धर्म पाळत नसून राजकीय मैत्रीच्या जबाबदा-या टाळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच ओबीसींच्या कोटय़ातून अतिमागासांना आरक्षण देण्याचे योगी सरकार टाळत आहे. हा प्रश्न ऑक्टोबरपर्यंत सोडवला गेला नाही तर नोव्हेंबरपासून सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही ओमप्रकाश राजभर यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपवर आणखी एक मित्रपक्ष नाराज झाला असल्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS