डेहराडून – उत्तराखंडमध्ये सध्या बक-यांची लगीनघाई सुरु आहे. धनोल्टी इथं २३-२४ फेब्रुवारीला बकऱ्यांच्या स्वयंवराचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे याठिकाणी सध्या बक-यांची लगीनघाई सुरु आहे परंतु त्यांच्या या लगीनघाईत दोन मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली असल्याचं पहावयास मिळालं आहे. मंत्रोच्चाराच्या घोषात हे स्वयंवर होणार असून याला सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पशुसंवर्धनमंत्री रेखा आर्य आणि सतपाल महाराज यांच्यात चांगलीच जुपली आहे.
दरम्यान राज्यातील पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी या उद्देशानं बक-यांच्या स्वयंवराचा कार्यक्रम पशूसंवर्धन मंत्री रेखा आर्य यांनी आयोजित केला आहे. या स्वयंवरादरम्यान मंत्रोच्चारही केला जाणार आहे. परंतु बक-यांच्या लग्नात हा मंत्रोच्चार केल्यामुळे हिंदू संस्कृतीला धक्का लागणार असल्याचं सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी म्हटलं आहे. परंतु यामुळं हिंदू संस्कृतीला कोणताही धक्का लागणार नसल्याचे स्पष्टीकरण पशुसंवर्धनमंत्री रेखा आर्य यांनी दिलंय.त्यामुळे हे दोन्ही मंत्री आपल्या भूमिकांवर ठाम असल्यानं त्यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली आहे. या दोघांचाही वाद आता मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या कोर्टात जाऊन पडला आहे. त्यामुळे या दोघांच्या वादावर मुख्यमंत्री आता काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS