मुंबई – नवनिर्वाचित आमदारांचा विधानसभा सभागृहात आज शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्याला दोन आमदारांनी अनुपस्थिती लावली. 288 पैकी 285 आमदारांनी आज शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 14 व्या विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 288 पैकी उपस्थित 285 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
कोळंबकर यांना कालच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ दिली होती. त्यामुळे आतापर्यंत 286 आमदारांचा शपथविधी झाला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावतीतील मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार हे अनुपस्थित होते. या दोन्ही आमदारांनी शपथविधीला उपस्थिती का लावली नाही याबाबतचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही.
दरम्यान पवार घराण्यातील सदस्य रोहित पवार यांनी आज प्रथमच आमदारकीची शपथ घेतली. ठाकरे व पवार यांच्या घराण्यातील आदित्य ठाकरे व रोहित पवार या दोन युवा आमदारांनी प्रथमच आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी रोहित पवारांनी घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरत आहे. शपथ घेताना आधी आपले नाव घेऊन पुढील शपथ पूर्ण करायची पद्धत असते. त्याच पद्धतीन रोहित पवारांनी आपले नाव घेतले, परंतु ते जरा वेगळ्या पद्धतीत. त्यांनी मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार, शपथ घेतो की असं म्हटलं. या वाक्यानंतर विधानसभेतील सर्व सदस्य त्यांच्याकडे बघत राहिले. इतर आमदार साधारण आपले व वडिलांचे नाव व आडनाव घेऊन शपथ घेतात. मात्र, रोहित यांनी आईचेही नाव घेतल्याने त्यांच्या शपथेची चर्चा सरु आहे.
COMMENTS