मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेचं अखेर ठरलं आहे. याबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत मनसेने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे एकूण 100 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. गेली काही दिवसांपासून मनसे निवडणूक लढवणार की नाही याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. परंतु आज अखेर मनसेनं विधानसभेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान विधानसभा निवडणूक न लढवण्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. परंतु मनसेच्या अनेक पदाधिकाय्रांनी निवडणूक लढवण्याची भावना व्यक्त केली. काही जागा लढवाव्यात असं काही पदाधिकाऱ्यांचं मत होतं. मात्र, राज ठाकरेंनी मागील बैठकीत निवडणूक लढण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नव्हता. त्यांनी केवळ पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली होती. आजच्या बैठकीत त्यांनी मनसेची अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता मनसे आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS