मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मनसेलाही सोबत घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षातील नेत्यांनी घेतला असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला महाआघाडीमध्ये सामील करण्यास विरोध केला होता, परंतु काँग्रेस आता विधानसभेच्या तोंडावर मोदीविरोधकांची एकजूट बांधण्यासाठी मनसेला सोबत घेण्यास उत्सुक असल्याचं दिसत आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात काँग्रेस नेत्यांसोबत याविषयी सकारात्मक चर्चा करत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मनसे आघाडीसोबत दिसण्याची शक्यता आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज यांना आघाडीत घेण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत. शहरी भागात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी मजबूत स्थितीत नसल्याचा राष्ट्रवादीचा अंदाज आहे. तर मनसेची ताकद मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यासारख्या शहरांमध्ये आहे. त्यामुळे मनसे सोबत आल्यास आघाडीला फायदाच होईल, असं मानलं जात आहे.
त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला होता. त्यानंतर राज्यात काँग्रेस कमकुवत स्थितीत असल्याचं दिसत आहे.त्यामुळे सशक्त पर्यात म्हणून काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला सोबत घेतलं जात असल्याची चर्चा आहे.
COMMENTS