मुंबई – महाराष्ट्र सरकार यंदा पहिली ते पाचवी पर्य़ंतच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचणासाठी पुस्तके खरेदी करणार आहे. ही पुस्तके ग्रंथालयात ठेवली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक पैसे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावर खर्च करणार आहे. मोदींवरील पुस्तकासाठी राज्य सरकार तब्बल 59 लाख 42 हजार रुपये मोजणार आहे. तर महात्मा गांधींवरील पुस्ककांसाठी फक्त 3 लाख 25 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्यावरील पुस्तकांसाठी 24 लाख 28 हजार, महात्मा फुले यांच्या पुस्तकांसाठी 22 लाख 63 हजार आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील पुस्तकासाठी 21 लाख 87 हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी या भाषेतील ही पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्यावरील पुस्तकांच्या एकूण किमतीपेक्षा एकट्या नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांची किंमत जास्त आहे. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मोदी आम्हालाही आदरणीय आहेत, मात्र ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलें पेक्षा मोठे आहेत का असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंयज मुंडे यांनी द एशियन एज या वृत्तपत्राशी बोलताना केला आहे. या पुस्तक खरेदीमध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरकार वल्लभाई पटेल यांच्यावरील एकाही पुस्तकाचा समावेश नाही.
COMMENTS