दिल्ली – नरेंद्र मोदी यांनी हिंमत असेल तर गुजरातमधून हार्दिक पटेलच्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं खुलं आव्हान गुजरातमधील युवक दलित नेता आणि विधानसभेत नुकताच प्रवेश केलेला जिग्नेश मेवानी यांनी दिलं आहे. हार्दिक विरोधात मोदींनी निवडणूक लढवली आणि ते जिंकले तर राजकारणातून संन्यास घेईन असंही आव्हान जिग्नेश मेवांनी यांनी दिलं आहे. गुजरात निवडणुकीनंतर टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने जिग्नेश मेवानी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीमध्ये जिग्नेश मेवानी यांनी हे आव्हान दिलं आहे.
नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सहका-याने या युवा त्रिकूटाने भाजपच्या नाकात दम भरला होता. सध्याच्या काळात देशात सर्वशक्तीमान समजल्या जाणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना त्यांनी गुजरात निवडणुकीत चांगलच जेरीस आणलं होतं. भाजपनं काठवारचं बहुमत मिळवलं असलं तरी काँग्रेसनंही मोठी झेप घेतली आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या गुजरातच्या या तीन्ही नेत्यांनी पुन्हा मोदी शाह यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तीनही नेत्यांनी आपली पूर्वीची आंदोलने अधिक जोमाने करण्याचे संकेत दिले आहेत.
निवडणूक निकालानंतरही जिग्नेश यांनी मोदींवर हल्लाबोल केला होता. मोदींचं वय झालं आहे. त्यानी आता निवृत्त व्हायला पाहिजे या शब्दात त्यांनी मोदींचा समाचार घेतला होता. भाजपचे गुजरात मॉडेल हे फेल झाले असून त्याचा गुजरातच्या जनतेला काहीच फायदा झाला नाही असा आरोपही जिग्नेश मेवानी यांनी केला आहे. आता मेवानी यांच्या आरोपाला भाजपकडून कशा प्रकारे उत्तर मिळते ते पहावे लागेल.
एकूणच विधानसभा निकालाच्या नंतर आत्मविश्वास बळावलेल्या काँग्रेस आणि या तीन नेत्यांनी आता लोकसभेची तयारी सुरू केल्याचं दिसून येत आहे. हार्दिक पटेल हा 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यास पात्र होणार आहे. त्यामुळे तो लोकसभेच्या रिंगणात उतरणार अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. तसं झाल्यास ती भाजपपुढे मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
COMMENTS