दिल्ली – सत्तेवर आल्यानंतर तब्बल सुमारे पावणे चार वर्षानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी कुठल्या खाजगी टीव्ही चॅनलला मुलाखत दिली आहे. त्यानंतर मोदींनी मुलाखती देण्याचा जणू सपाटाच लावला आहे असं चित्र निर्माण झालं आहे. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. एवढच नाही तर कुठल्याही खाजगी न्यूज चॅनलला मुलाखतही दिली नाही. भाषणातून किंवा रेडिओवरील मन की बात म्हणून त्यांनी जनतेशी एकतर्फी संवाद साधला. आता मात्र त्यांनी मुलाखतीचा सपाटा सुरू केला आहे.
तब्बल पावणे चार वर्षानंतर पंतप्रधान मोदींनी मुलाखती देण्याचा निर्णय का घेतला असेल याची आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीच्या दृष्टीने मोदींनी हा मुलाखती देण्याचा निर्णय घेतला असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रुंगू लागली आहे. या वर्षाअखेर मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यांच्यासोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पुढच्या महिन्यात पुर्वेकडच्या तीन राज्यात निवडणुका होत आहेत. मात्र ती राज्य तुलनेने आणि खासदारांच्या संख्येचा विचार करत फारशी महत्वाची नाहीत. आणि तिथे भाजपला फारशी चांगली कामगिरी करता येणार नाही असा अंदाज आहे. त्यानंतर कर्नाटकात विधानसभेची निवडणूक आहे. तिथेही भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता दुरापास्त आहे. त्यानंतर वर्षाअखेर भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणा-या तीन राज्यात निवडणुका आहेत. तिथेही जर खराब कामगिरी झाली तर 2019 ची लोकसभा पक्षाला खूप जड जाईल असा कयास लावला जात आहे. त्यामुळेच या तीन राज्यांच्या निवडणुकांसोबत लोकसभेची निवडणूक घेतली जाऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
COMMENTS