नाशिक – “अरे चाललंय काय? जो येतो तो ‘दादा, निधी वाढवून द्याच’ असा पिच्छा पुरवतोय. अरे राज्याच्या तिजोरीची परिस्थिती काय अन् तुम्ही मागताय काय?” राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत आर्थिक नियोजनाच्या विभागीय बैठकीत शाब्दिक फटकेबाजी केली. वित्तं खात्याचं नाव बदलून ‘पैसेवाटप खातं’च ठेवावं लागेल, यांसारख्या शेरेबाजीमुळे विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन हॉलमध्ये हास्याचे कारंजे उडाले. मंत्र्यांसह आमदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाब्दिक कोट्यांना दिलखुलास दाद दिली.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील वाढीव निधी मिळावा, यासाठी अजित पवारांपुढे हात जोडले. त्या वेळी त्यांच्या मनगटावर बांधलेल्या शिवबंधनांनी पवार यांचे लक्ष वेधून घेतले. “अहो किती बंधन घातलीत तुम्ही,” असा टोला पवार यांनी लगावला. ‘यात एक बंधन तुमचेही आहे’ असे उत्तर देत पाटील यांनी हजरजबाबीपणाचे दर्शन घडविले.
नाशिकसाठी वाढीव निधीची मागणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे हात जोडून केली. त्यावर हात जोडत ‘साहेब, तुम्ही मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहात. एवढा निधी मागताय. तुम्हाला राज्याची परिस्थिती माहीत आहे ना, असे पवार म्हणाले. मी ज्येष्ठ असलो तरी तुमचे खाते मोठे आहे. त्यामुळे आम्हाला निधी वाढवून दिला तर विकासकामे करणे शक्य होईल, असे म्हणत भुजबळ यांनी निधी पदरात पाडून घेतला.
धुळे जिल्ह्यासाठी वाढीव निधी मंजूर करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनीदेखील हात जोडून पवारांना साकडे घातले. “साहेब, तुम्ही राजा आहात. तुम्ही ठरवले तर वाढीव निधी देऊ शकता,” असे सांगत सत्तार यांनी पुन्हा हात जोडले. “तुमचं सगळं खरं आहे; पण राजा आणि राणी असं काही नसतं रे. त्यामुळे बोलणे आता उरका,” अशी टोलेबाजी पवार यांनी केली.
COMMENTS