नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्ष पुन्हा एकदा उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या १८ जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यादरम्यान तेलुगु देसमकडून अविश्वास प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता असून आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलुगु देसम पक्षाने केली होती. त्यासाठी त्यांनी मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान यापूर्वी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तेलुगु देसमने मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो पूर्णत्वाला जाऊ न शकल्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी तेलुगु देसमने केली असल्याची माहिती आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान तेलुगु देसमने लोकसभेत अविश्वास प्रस्तावही आणला होता. परंतु अण्णाद्रमुक आणि अन्य पक्षांच्या खासदारांच्या गोंधळाच्या नावाखाली हा प्रस्ताव दाखल होऊ शकला नाही. आंध्र प्रदेशच्याच मुद्द्यावरून आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील पाच खासदारांनी राजीनामे दिल्यामुळे तेलुगु देसम पुन्हा दबावाखाली असून अविश्वास प्रस्तावाचे अस्त्र वापरू शकते असं बोललं जात आहे. तेलुगु देसमचे लोकसभेत १६ खासदार असून सभागृहाचे कामकाज चालू द्यायचे नसल्याचा निर्धार त्यांनी केला असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS