खासदार अमोल कोल्हेंचा प्रण पूर्ण,  धनंजय मुंडेंच्या हस्ते बांधला फेटा!

खासदार अमोल कोल्हेंचा प्रण पूर्ण, धनंजय मुंडेंच्या हस्ते बांधला फेटा!

परळी – ‘जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,’ हा खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत केलेला प्रण आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून पूर्ण केला.’गेल्या चार महिन्यांहुन अधिक काळ खा. अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला नव्हता, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अभिनयातून देशाच्या घराघरात पोचवलेल्या खा. अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो; आज फेटा बांधताना मित्र कसा असावा ह्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे होय, मी आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्यांना फेटा बांधून त्यांचा प्रण आज पूर्ण केला व त्यांचे व मला निवडून दिलेल्या तमाम परळीकरांचे आभार मानतो’ अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने परळीत आल्यावर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे निवडून आल्याशिवाय फेटा बांधणार नाही असा प्रण केला होता. ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने आज हा प्रण पूर्ण झाला आहे.

यावेळी बोलताना ना. मुंडेंनी मागील दोन कार्यक्रमात जनतेशी संवाद साधण्याची संधी हुकल्याचे सांगत निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुन्हा एकदा आठवण करत परळीकरांना दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह, येत्या दोन वर्षांच्या आत १००% प्रदूषण व धुळी पासून मुक्ती हे आपले ध्येय असल्याचेही ना. मुंडे म्हणाले. तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पात परळीतील तीर्थक्षेत्र विकासासह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी भरीव आर्थिक तरतूद आपण मिळवणार असल्याचेही ना. मुंडे यावेळी म्हणाले.

अंबाजोगाई रस्त्याचे काम येत्या ४ दिवसात सुरू करणार…

दरम्यान सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी ते अंबेजोगाई रस्त्याचे काम येत्या ४ दिवसात सुरू होईल, मागील ५ वर्ष थांबलात, मलाही थोडा वेळ द्या असे म्हणत धनंजय मुंडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. अंबेजोगाई रस्त्याबरोबरच ४ वेळ भूमिपूजन होऊनही साधे टेंडर सुद्धा होऊ शकले नाही तो परळीचा बाह्यवळण रस्त्याचे कामही एप्रिल महिन्यात सुरू करणार असल्याचे यावेळी ना. मुंडे म्हणाले.

परळीकरांनी माझा मान राखला – खा डॉ. अमोल कोल्हे..

निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी परळीत आलो, आपणाला आवाहन केले, धनंजय मुंडे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा प्रण मी केला, माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक कर्तबगार मंत्री आपण निवडून दिलात, त्यांच्या कर्तबगारीवर आम्हाला अभिमान आहे असेही यावेळी बोलताना खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

मला कधी जात – पात शिवली नाही – धनंजय मुंडे

दरम्यान मागील काही दिवसांमध्ये परळी शहरात दोघाजनांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणाचे मध्ये जात आणून राजकारण केल्यावरून धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

मला कधीच जात-पात शिवली नाही, परळीतील प्रत्येक कुटुंबाचा मी सदस्य आहे. सगळेजण माझ्या जवळचे आहेत. कोणाचाही वैयक्तिक भांडणात जात-पात आणून त्यात माझे नाव गोवणे म्हणजे निव्वळ काम नसल्याचे लक्षण आहे असा टोलाही मुंडेंनी लगावला. तसेच सामाजिक सलोखा व आपसातील नाते अबाधित ठेवून परळीच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहनही मुंडेंनी उपस्थितांना केले. यावेळी अनेक मान्यवरांसह परळी व परिसरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.

COMMENTS