नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात महाआघाडी बनवण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याबाबत अनेकवेळा याचे सूतोवाच केले आहे. मात्र उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी केलेल्या आघाडीमुळे भाजप विरोधातील आघाडीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सपा बसपानं उत्तर प्रदेशात चक्क जागावाटपही करुन टाकले आहे. सपा 37 तर बसपा 38 जागा लढवेल. तर अजित सिंग यांच्या आरएलडीला 3 जागा सोडल्या जातील. तसंच रायबरेली आणि अमेठी या दोन गांधी घराण्याच्या मतदारसंघात उमेदवार दिला जाणार नाही असंही सपा बसपानं स्पष्ट केलं आहे. अर्थात अधिकृतपणे याबाबत अजून घोषणा होणे बाकी आहे. मायावतींच्या वाढदिवसाच्या दिवशी ही घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजप विरोधात आघाडी करताना पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे आघाडीचं दुखणं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधी कोणालाही पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं जाणार नाही असं आघाडीतील नेते म्हणत आहेत. शरद पवार, अखिलेश यादव, मायावती, ममता बॅनर्जी या नेत्यांनी आघाडी करु पण पंतप्रधानपदाचा उमेदवार नंतर ठरवू असं म्हटलं आहे. या सर्वच नेत्यांना संधी आल्यास पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा आहे. परवा राहुल गांधी चेन्नईमध्ये असताना डीएमकेचे सर्वेसर्वा एम के स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करुन टाकले. हे वरील नेत्यांना रुचणारे नाही. स्टॅलिन यांच्यासारखी प्रत्येक पक्षाची भूमिका असणे जरुरीचे नाही असं उत्तर अखिलेश यादव यांनी स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर दिलं आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार आधीच ठरवला जाऊ नये त्यामुळे काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी सपा बसपाची ही खेळी असू शकते.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणज्ये उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद फारशी नाही. मात्र काँग्रेसला उत्तर प्रदेशात जवळपास 15 जागा हव्या असल्याची माहिती आहे. सपा- बसपा मात्र त्यांना 5 ते 6 च्या पुढे जागा देण्यास तयार नाही. काँग्रेसचा पराभव करण्यास सपा बसपाची आघाडी पुरेशी आहे असा दोन्ही पक्षांचा दावा आहे. त्यात त्यांनी काही भागात प्रभाव असलेल्या अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकदलालाही तीन जागा दिल्या आहेत. काँग्रेसने उत्तर प्रदेशात जास्त जागा मागू नये अशीही सपा –बसपाची खेळी असू शकते. अशी आघाडी झाल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसला बसू शकतो. तसंच भाजपला काही प्रमाणात फायदा होऊ शकतो.
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तिगड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी दमदार झाली आहे. आता उत्तर पदेशातही काँग्रेस अशीच फोफावू नये याची काळजी सपा बसपा घेत असल्याचीही शक्यता आहे. दोन्ही पक्षांचा मतदार आणि काँग्रेसचा मतदार एकच आहे. त्याचाही फटका दोन्ही पक्षांना बसू शकतो. त्यामुळेही सपा बसपाने काँग्रेस उत्तर प्रदेशात फार हातपाय पसरणार नाही याचीही काळजी घेतल्याचं दिसत आहे.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तिसगड या राज्यांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याचा सपा आणि बसपाने प्रयत्न केला होता. मात्र काँग्रेसने दोन्ही पक्षांसोबत आघाडी केली नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष नाराज आहे. काँग्रेसला जिथे फायदा आहे तिथेच आघाडी हवी असते. त्यामुळे काँग्रेसनही इतर राज्यातही काही जागा आमच्यासाठी सोडाव्यात अशी दोन्ही पक्षांची मागणी असल्याचं कळतंय. त्यामुळे हे दबाबतंत्र असण्याची शक्यता आहे. तीन्ही राज्यात आघाडी केली नसली तरी सपा बसपाने काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात सपा बसपाने काँग्रेस वगळता केलेला आघाडीचे संकेत हे काँग्रेसवरचे दबावतंत्र असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता काँग्रेस यावर कशी भूमिका घेते त्यावर पुढील गणिते अवलंबून आहेत.
COMMENTS