उस्मानाबाद – लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. परंतु हा निकाल लागण्यापूर्वीच एक नेता खासदार झाला आहे. उस्मानाबाद मतदारसंघातील आणि बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावातील नागरिकांनी लोकसभेचे उमेदवार असलेल्या शंकर गायकवाड यांची गावचा खासदार म्हणून घोषणा केली आहे. शंकर गायकवाड हे शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते या गावातीलच तरुण आहेत.
दरम्यान उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले.परंतु या गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. गावात असलेल्या असुविधांबद्दल उमेदवार आणि स्थानिक नेत्यांबद्दल नाराजी दर्शवत अख्ख्या गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. विशेष म्हणजे यावेळी शंकर गायकवाड यांनीही गावच्या विनंतीला मान देत मतदानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर, गावकऱ्यांनी चक्क गावचा खासदार म्हणून शंकर यांना घोषित केले, तसेच त्यांचा सत्कार करुन मिरवणूकही काढली आहे.
या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील हे उमेदवार आहेत. तर, शिवसेनेकडून माजी आमदार ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाला लोकसभा निवडणुकांसाठी उस्मानाबाद या मतदारसंघात स्थान देण्यात आले आहे.
त्यामुळे तालुक्यातील हक्काचा उमेदवार म्हणून तालुक्यातील वाणेवाडी गावचे पुत्र शंकर गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु गावकऱ्यांच्या विनंतीपूर्वक दबावामुळे चक्क उमेदवार शंकर यांनीही मतदानावर बहिष्कार टाकला. त्यानंतर, मतदानावर बहिष्कार टाकलेल्या या गावाने एकदिलाने शंकर गायकवाड यांची आपला खासदार म्हणून निवड केली आहे.
COMMENTS