मुंबई – आज राज्यभर पाळण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदनंतर उद्या राज्यातील काही जिल्ह्यामध्ये बंद पाळण्यात येणार आहे. याबाबतची बैठक मराठा संघटनांनी घेतली असून उद्या मुंबईसह, नवी मुंबई ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. आज घेण्यात आलेल्या बैठकीला डोंबिवलीसह दिवा, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर, विरार आदी ठिकाणचे मराठा बांधाव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निषेधाचा ठराव मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत मांडण्यात आला असून विविध जिल्ह्यात ठिय्या आंदोलन सुरू असताना सरकारचा कुणीही प्रतिनिधी पोहचला नाही. त्यामुळे तुम्ही काहीही करा तुम्हाला काहीही मिळणार नाही अशी सरकारची भूमिका दिसत असल्याचं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे ठोक मोर्चात रुपांतर झालं असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यानन उद्याच्या मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार आणि हिंसा होणार नसल्याचंही या संघटनांनी म्हटलं आहे. तसेच कुठलीही तोडफोड होणार नसून उद्याच्या बंदमधून अत्यावश्यक सेवा, शाळेच्या बसेस, दूध सेवा वगळले आहेत. तसेच शाळा, कॉलेज बंदमधून वगळण्यात आले आहेत, त्या सुरू राहणार असल्याची माहिती मराठा संघटनांनी दिली आहे. तसेच नवी मुंबईततील सर्व बाजार बंद ठेवण्यात येणार असून बंदमधून भाजी आणि फळे मार्केट वगळण्यात आले आहेच. तसेच माथाडी संघटनांनीही उद्या नवी मुंबईत बंद पुकारला आहे.
COMMENTS