मुंबई – मुलुंडमध्ये सरदार तारासिंगांचा वारसदार कोण यावरुन भाजपात घमासान ?

मुंबई – मुलुंडमध्ये सरदार तारासिंगांचा वारसदार कोण यावरुन भाजपात घमासान ?

मुंबई – विधान सभेच्या निवडणुकीला अजून जवळपास दीड वर्षांचा कालावधी शिल्लक असला तरी त्याआधीही निवडणुका लागू शकतात हे गृहीत धरुन अनेकांनी आतापासूनच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला आहे. गेली अनेक वर्ष या मतदारसंघातून सरदार तारासिंग निवडूण येत आहेत. गेल्यावेळीच वयाच्या मुद्यावरुन त्यांचे तिकीट कापले जाणार अशी चर्चा होती. मात्र ऐनवेळी पुन्हा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली. यावेळी मात्र आता मुलुंडमध्ये भाजपचा उमेदवार बदलला जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच या बालेकिल्ल्यात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.

             भाजपकडून मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश गंगाधरे हे दोघेजण उमेदावारीसाठी प्रबळ दावेदार समजले जातात. त्यामुळेच या दोघांमध्ये उमेदावारीवरुन जोरादार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील कामाचे श्रेय घेण्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ पहायला मिळत आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही. तर एकमेकांची बदनामी करण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. एकमेकांच्या भागात जाऊन तिथून फेसबूक लाईव्ह करण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचं दिसून येत आहे. या बदनामी प्रकरणाची तक्रार मंबईच्या अध्यक्षांपर्यंत गेल्याचीही चर्चा आहे. निवडणूकीसाठी दीड वर्षांचा कालावधी असताना  एवढी लढाई सुरू असेल तर निवडणूक जवळ आल्यावर तर काय होईल हे सांगता येत नाही. यातून वरीष्ठ नेते कसा मार्ग काढतात की पुन्हा सरदार तारासिंग यांच्या गळ्यात उमेदवारी पडते की ऐनवेळी छुपे इच्छुक बाजी मारतात हे येणार काळच सांगेल.

COMMENTS