मुंबई – मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर आज हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे. हा हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यानी केल्याचा संशय आहे. या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. हे तीनही जण मनसेचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जातंय.
गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्याचा मुद्यावरुन काँग्रेस आणि मनसेमध्ये राडा सुरू आहे. मनसेच्या दोन विभाग अध्यक्षांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये मनसेचे दोन्ही विभाग अध्यक्ष जखमी झाले होते. संजय निरुपम यांनीही मनसेवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. त्यावरुन दोन्ही पक्षात वाद होता. त्यामुळेच चिडलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा संशय आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी मनसेने घेतली आहे. पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या हल्ल्याला मनसेचा संजय निरुपम यांच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक असं म्हटलंय. अनधिकृत फेरीवाला आंदोलन प्रकरणात अलीकडच्या काळात मुंबई काँग्रेस कार्यकर्ते आणि फेरीवाल्यांकडून मार मिळत होता. राज ठाकरे या घटनांमुळे चांगलेच संतापले होते. मला पक्षात मार खाणारे नाहीत, तर मार देणारे कार्यकर्ते अपेक्षित आहेत अशी तंबी त्यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्याना दिली होती. तसेच यापुढे मार खाऊन आलात तर पदावरून काढून टाकेन असा दमही त्यांनी भरला होता. त्यामुळे मनसेने मारहाणीचा बदला घेण्यासाठी मुंबई काँग्रेस कार्यालयाला आज लक्ष्य केलं.
दरम्यान या हल्ल्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी निषेध केलाय. वाद असतील तर ते चर्चेच्या माध्यमातून सोडवले पाहिजेत असंही चव्हाण म्हणाले. ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत ते गुद्द्यावर येत आहेत अशी टीकाही त्यांनी मनसेवर केली आहे.
COMMENTS