मुंबई – मुंबई महापालिकेच्या सायन प्रभाग क्रमांक 173 चे नगरसेवक प्रल्हाद ठोंबरे यांचे निधन झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक होत आहे.या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत असून शिवसेनेच्या विरोधात काँग्रेसने शिवसैनिकालाच उमेदवारी दिली आहे. शिवसैनिक असलेल्या सुनील शेट्ये यांना उमेदवारी दिली असल्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची मतं कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे.
दरम्यान शिवसेनेकडून या निवडणुकीसाठी रामदास कांबळे यांना उमेदवारी दिली असून शिवसेनेच्या विरोधात दिवंगत नगरसेवक ठोंबरे यांचे भाऊ बापू ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. परंतु त्यांची समजूत काढत शिवसेनेनं ठोंबरे यांचा अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यातच काँग्रेसनंही शिवसैनिकाला उमेदवारी दिल्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेची अनेक मते काँग्रेसला मिळू शकतात. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान प्रभाग 21 मधील भाजप नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार न देता भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्याची परतफेड भाजपाने प्रभाग क्रमांक 173 मध्ये उमेदवार न देता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेनेचे रामदास कांबळे, काँग्रेसचे सुनील शेट्ये आणि अपक्ष असलेले गौतम झेंडे हे आमनेसामने आहेत.
COMMENTS