मुंबई – मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी कामत-देवरा गटाने पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केल्यानंतर निरुपम यांचे अध्यक्षपद वाचवण्यासाठी निरुपम समर्थक सक्रीय झाले आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. संजय निरुपम समर्थकांनी राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. तसंच संजय निरुपम यांनाच अध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी केली आहे.
संजय निरुपम समर्थक आमदार असलम शेख, जावेद खान, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा, माजी आमदार बलदेव खोसा, चरण सिंग सप्रा, अशोक सूत्राले, हुकूमराज मेहता, महिला अध्यक्ष डॉ अजंता यादव, कचरू यादव, बब्बू खान , सतीश मनचनदा, गुजराथी सेलचे अध्यक्ष उपेंद्र दोषी, मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरेंद्र उपाध्याय, सरचिटणीस भूषण पाटील, संदेश कोंडवीलकर आणि ब्रिजमोहन शर्मा तसंच काही नगरसेवक यांनी राज्य प्रभारी मल्लीकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे.
संजय निरुपम यांची तक्रार करणारे नेतेच भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असा दावा संजय निरुपम समर्थकांनी खरगे यांच्याकडं केल्याचं समतंय. समर्थकांनी संजय निरुपम यांची बाजू खरगे यांच्यासमोर मांडली. संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसमधी असे एकटे नेते आहेत जे काँग्रेसचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरतात, भाजपविरोधी आंदोलने करतात, मुंबईमध्ये त्यांनी काँग्रेसला बळ आणलं आहे असा दावाही समर्थकांनी केला आहे.
दरम्यान त्याच्या आधी संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी देवरा आणि कामत गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुंबईतील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आहे. जनार्दन चांदुरकर, भाई जगताप, एकनाथ गायकवाड, नसिम खान, सुरेश शेट्टी, बाबा सिद्दीकी, कृपाशंकर सिंग, अमिन पटेल मुंबई युथ आणि मुंबई एनएसयूआयच्या अध्यक्ष या सर्वांनी खरगे यांची भेट घेतली. तसंच निरुपम यांच्याविषयी तक्रार केली. या सर्व नेत्यांनी मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. तसंच राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर तोडगा काढण्यात काँग्रेस श्रेष्ठींना कसं यश मिळतं ते पहावं लागेल.
COMMENTS