मुंबई – लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. या निवडणुकीतही भाजपनं मोठी आघाडी घेतली आहे. मुंबईतील सर्वच मतदारसंघात शिवसेना-भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. देशात एनडीएला 345 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 89 जागांवर आघाडी मिळाली आहे. 108 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे.तसेच महाराष्ट्रातील 48 जागांवर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे.
दरम्यान मुंबईतील सहाही जागा शिवसेना भाजपनं राखण्यात यश मिळाले आहे.आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार सहाही जागांवर शिवसेना-भाजपचे उमेदवारांचा विजय निश्चित माना जात आहे. दक्षिण मुंबई मतदार संघातून शिवसेनेचे अरविंद सावंत यांचा विजय झाला आहे. याठिकाणी काँग्रेसचे मिलिंद देवरा पराभूत झाले आहेत. दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे पुन्हा निवडून आले आहेत. काँग्रेसचे एकनाथ गायकवाड शेवळेंसमोर तगडं आव्हान उभं करण्यात अपयशी ठरले आहेत.
तसेच मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या गजानन कीर्तिकर यांनीदेखील त्यांचा गड राखण्यात यश मिळवले आहे. कीर्तिकरांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांना धूळ चारली आहे.
मुंबईतल्या तीनही जागा शिवसेनेने राखल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजपनेही त्यांच्या जागा राखल्या आहेत. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव झाला असून भाजपच्या पूनम महाजन या विजयी झाल्या आहेत.तसेच उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टींसमोर काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी तगडे आव्हान उभे केले होते. परंतु गोपाळ शेट्टींनी त्यांचा गड राखला आहे. ईशान्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या मनोज कोटक यांनी राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांचा पराभव केला आहे.
COMMENTS