मुंबई – चांदा ते बांदा योजनेचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला तसेच योजनेतील कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वित्त व नियोजन राज्य मंत्री दीपक केसरकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, चंद्रपूर जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूर आणि सिंधुदूर्ग या दोन जिल्ह्यात हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत असून याच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभरात हा पॅटर्न राबविला जाणार आहे. त्यामुळे योजनेतील विविध विकास कामांना, रोजगार निर्मिती करणाऱ्या उपक्रमांची आखणी आणि अंमलबजावणी ही वेळेत, व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे असे श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या विकास कामांच्या प्रगतीची माहिती त्यांनी घेतली. यामध्ये चंद्रपूर शहरातील पर्यटन स्थळे (नलेश्वर, घोडझरी) विकसित करणे, माजी मालगुजारी तलावाच्या परिसरात पर्यटन विकासाची कामे करण्यात येत आहेत.
याशिवाय रोजगार निर्मितीला चालना देणारे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये बांबूचे मूल्यवर्धन करून बांबूपासून विविध वस्तू तयार करणे, मूल्यवृद्धी करणाऱ्या उद्योगांची स्थापना करणे, गोंडपिंपरी, ब्रम्हपूरी आणि रामपूर येथे हस्तकला रोजगार निर्मिती केंद्र उभारणे, रामबाग येथे बांबू रोपवाटिका तयार करणे, प्रशिक्षण कार्यशाळेचे बांधकाम करणे, मध शुद्धीकरण प्रक्रिया व साठवणूक केंद्र उभारणे, मध संकलन करण्यासाठी मशिनरी आणि टुलसची खरेदी करणे, मधुमक्षिका पालन केंद्रे सुरु करणे, सौर उर्जेची उपकरणे आणि लाईटसची खरेदी, मोहफुलांचे संकलन-प्रक्रिया आणि वनौषधींचा विकास करणे, कृषी क्षेत्राच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे अशी अनेक कामे यात घेण्यात आली आहेत.
बांबू संशोधन केंद्राने प्रमाणित केलेल्या बांबू निर्मित वस्तुच्या विक्रीसाठी अब्दुल कलाम गार्डन व मोहर्ली येथे शोरूमची उभारणी करण्याचे काम ही यात करण्यात येईल. बांबू प्रकल्पाद्वारे रोजगार निर्मितीसाठी चंद्रपूर, विसापूर पोंभूर्णा आणि मूल आणि चिमूर येथे सर्वसाधारण उपयोगिता केंद्रास सामुहिकरित्या बांबू कामासाठी लागणारी यंत्रसामग्री खरेदी करणे, चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबूसेटम प्रकल्प राबविणे, ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी गोदामांचे बांधकाम करणे, वरोरा, चिमूर, बल्लारपूर, पोंभूर्णा, गोंडपिंपरी, जिवती आणि कोरपना तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर तयार करणे, पथदर्शीस्तरावर साखळी बंधारे बांधणे, आरवट, शिवनीचोर, मारडा, ता. चंद्रपूर येथे तसेच नांदगाव, हडस्ती, चारवट, पळसगाव, कोठारी, आमडी- ता. बल्लारपूर येथे भाजीपाला क्लस्टर विकसित करण्याचे काम ही या योजनेतून होणार आहे. अशा विविध कामांमधून जिल्ह्याचा विकास साधतांना युवकांच्या हातांना रोजगार देऊन आर्थिक चळवळ गतिमान करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
COMMENTS