मुंबई – महाविकास आघाडीत शिवसेनेची ताकद वाढली असून जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे गडाख यांचा अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे.शंकरराव गडाख आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. त्यामुळे विधानसभेत गडाख यांनी निवडून येताच शिवसेनेत प्रवेश करावा असा आग्रह नार्वेकर यांनी केला होता. त्यावेळी गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आज अखेर गडाख यांनी शब्द राखत शिवसेनेत अधिकृतरित्या प्रवेश केला आहे.
दरम्यान शंकरराव गडाख नेवासा विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडून आले होते.
शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांच्या काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्हयात शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ती भरुन निघणार आहे. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
COMMENTS