मुंबई – महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 1750 कोटी रुपयांचे गहू केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मिळाल्याचा दावा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र इतके गहू महाराष्ट्राला मिळालेच नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब यांनीह पत्रकार परिषद घेऊन केला आहे. ट्रेनबाबतही फडणवीसांनी खोटा दावा केला असून मजुरांसाठी ट्रेनबाबत केंद्र सरकारकडून गोंधळ सुरू आहे. दिलेल्या वेळेत ट्रेन न आल्याने मजुरांना ताटकळत उभं केलं जात आहे. ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या जात आहेत. गुजरात राज्य महाराष्ट्रापेक्षा छोटं असताना त्यांना 1500 ट्रेन दिल्या तर आपल्याला केवळ 700 ट्रेन देण्यात आल्या, तसंच महाराष्ट्राच्या हक्काचे पैसेही केंद्र सरकार देत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.
तसेच मुख्यमंत्री निधीला एकही रुपया न देता इथे निधी देऊ नये असे आवाहन केले. त्यामुळे भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का ? असा प्रश्न उभा राहतोय. केंद्राने पीपीई आणि मास्क दिल्याचे फडणवीस म्हणाले. राज्यात १० दहा लाख पीपीई कीट, १६ लाख मास्क दिल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात ४९ लाख १३ हजार ५०० एन९५ मास्क मागितले. पण ३० ट्क्के हून कमी आले. पीपीई किट्स, व्हेंटीलेटर, इन्फ्यूजन पंप आले नाही. आम्ही करत असलेल्या प्रयत्नामध्ये भाजप कुठे दिसत नाही. फडवणवीसांनी विरोधकांची भूमिका सोडून सहाय्याची भूमिका घ्यायला हवी असे आवाहन मंत्री जयंत पाटलांनी केले.
केंद्राने काही सूचना दिल्या आहेत पण आलेले पॅकेज परवडणारे नाही. कठीण प्रसंगात केंद्राकडून विशेष मदत मिळाली नाही. तरीही गुजरात, उत्तर प्रदेश कोणत्याही राज्यापेक्षा मुंबई, महाराष्ट्र जास्त काम झाल असल्याचंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महाराष्ट्र आणि मुंबईची परिस्थिती हाताबाहेर गेल्याच्या बातम्या सोडल्या जात आहेत, मात्र देशात सर्वात चांगले काम मुंबईत झाले असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मे महिनाअखेर राज्यात दीड लाख कोरोना केस होतील असा केंद्र आणि WHO चा अंदाज होता, मात्र फार तर 60 हजार पर्यंत जातील असा आमच्या टास्क फोर्सचा अंदाज असल्याचं जयंत पाटील म्हणालेत.
आमची मानसिकता ढळू देणार नाही, महाराष्ट्र कोरोनामुक्त करणार, फडणवीसांच्या प्रश्नांना उत्तर देऊ असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान गरीब कल्याण योजनेच्या अंतर्गत केंद्राने राज्याला मोठी मदत केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनाही आर्थिक मदत करण्यात आली. अशा विविध योजनांतून केंद्राने महाराष्ट्राला हजारो कोटींची मदत केली आहे.
राज्य सरकार केंद्रातून आलेले पैसे खर्च करताना दिसत नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस केला होता. यावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
COMMENTS