मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमची अहमदनगर महापालिकेच्या उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. तसेच भाजपनं श्रीपाद छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत उपमहापौरपदाच्या निवडणुकीपासूनही माघार घेतली. त्यामुळे या उपमहापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उपमहापौरपदाची निवडणूक आज घेण्यात आली असून उपमहापौरपदी शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान उपमहापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात उमेदवार देण्यावरून मतमतांतर सुरु असल्यामुळे यामधून राष्ट्रवादी काँग्रेसने माघार घेतली. तसेच उमेदवार देणार नसले तरी भाजप कोणाला मत देणार याकडे लक्ष लागलं होतं. परंतु भाजपमध्येही दोन गट पडल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. परंतु यावेळी शिवसेना मात्र भक्कम स्थितीत होती. तसेच यावेळी दिलीप गांधी गटाने या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता, तर विविध पक्षातील अनेक नगरसेवक सभागृहात आलेच नाहीत. त्यामुळे उपमहापौरपदाची माळ शिवसेनेच्या गळ्यात अलगद पडली असल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS