मुंबई – राज्यातील काही नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कणकवली (जि. सिंधुदुर्ग) व आजरा (जि. कोल्हापूर) नगरपंचायत, तसेच जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) नगरपरिषदेत मतदान घेण्यात येत आहे.मतमोजणी मात्र 12 एप्रिल 2018 रोजी होणार आहे. सहारिया यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 5 मार्च 2018 रोजी 6 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार गुहागर, देवरूख (जि. रत्नागिरी), कणकवली (जि. सिंधुदुर्ग), आजरा (जि. कोल्हापूर), जामनेर (जि. जळगाव) व वैजापूर (जि. औरंगाबाद) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 6 एप्रिल 2018 रोजी मतदान व 7 एप्रिल 2018 रोजी मतमोजणी होणार होती. न्यायालयीन निकालाच्या अनुषंगाने या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर व देवरूख नगरपंचायतींसाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होणार आहे.
त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीतील प्रभाग क्र. 10 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी, तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.7 मध्ये सदस्य व अध्यक्षपदासाठी 11 एप्रिल 2018 रोजी मतदान होईल. उर्वरीत सर्व ठिकाणी उद्या मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रमातील बदलानुसार 11 एप्रिल 2018 रोजी होणाऱ्या मतदानावर प्रभाव पडू नये म्हणून या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांची संपूर्ण मतमोजणी 12 एप्रिल 2018 रोजी होईल. रत्नागिरी, आळंदी, तासगाव, दुधनी, सावदा, कुंडलवाडी व कळंब या नगरपरिषदा / नगरपंचायतींतील प्रत्येकी एका रिक्तपदासाठी देखील उद्या मतदान होत आहे. यांची मतमोजणीही 12 एप्रिल 2018 रोजी होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.
नगरपरिषद / नगरपंचायतनिहाय एकूण जागा आणि सदस्य व अध्यक्षपदाच्या उमेदवारांची संख्या: गुहागर (17)- 47, अध्यक्ष- 3, देवरूख (17)- 62, अध्यक्ष- 5, कणकवली (17)- 59, अध्यक्ष- 4, आजरा (17न)- 70, अध्यक्ष- 3, जामनेर (24)- 57, अध्यक्ष- 2 आणि वैजापूर (23)- 54, अध्यक्ष- 5.
COMMENTS