शेतकरी प्रश्न, सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक,  विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित !

शेतकरी प्रश्न, सावरकरांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित !

नागपूर – विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला. शेतकरी प्रश्न आणि सावरकरांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. भाजप आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे विधीमंडळ सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.

दरम्यान सभागृहाचं कामकाज सुरु होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधकांनी राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळात सभेचं कामकाज सुरुच राहिलं. विरोधकांनी वीर सावरकरांचं पोस्टर फडकावत ‘मी पण सावरकर’ लिहिलेली टोपी घालून भाजपचे आमदार सभागृहात आले. त्यानंतर या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

सभागृहातून बाहेर पडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सावरकरांवरील वक्तव्याबाबत माफी मागत नाहीत, तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील.सत्तेची लाचारी सावरकरांचा अपमान सहन करणारी असेल, तर ती काय कामाची? हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत आहेत. आमच्यावर हक्कभंग आला तरी चालेल, पण सावरकरांवर बोलू द्यायलाच लागेल.
तसेच सभागृहात सावरकरांविषयी बोलताना तो भाग कामकाजातून काढून टाकण्यात आला. सावरकरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा हा अपमान असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS