जळगाव – नवीन कृषी कायद्यांना विरोधासाठी शेतकऱ्यांनी साठ दिवसांपासून दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी तटबंदी उभारून आत राहत आहेत. मला नरेंद्र मोदी यांच्यामध्ये १७७१ साली मराठी फौजेपासून संरक्षण करण्यासाठी अशीच तटबंदी उभारणारा अफगाणिस्तानातून आलेल्या नजीब खान दिसत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भुसावळ येथे केली.
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी रात्री, भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालयात राष्ट्रवादी परिवार संवाद मेळावा पार पडला. मेळाव्यात माजीमंत्री एकनाथ खडसे, आमदार अनिल पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, गफ्फार मलिक आदी उपस्थित होते.
जयंत पाटील यांनी पुढे सांगीतले की, नरेंद्र मोदी यांनी २ निर्णय घेतले. पहिल्या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. त्यामुळे तटबंदी उभारून मोदी आत राहत आहेत. स्टीलची रेलिंग असो, मोठमोठे खड्डे खोदून तसेच अर्धा ते एक फुटांपर्यंतचे खिळे उभारून मोदींनी तटबंदी तयार केली आहे. शेतकरी आपल्या अंगावर येतील आणि काहीतरी करतील, या भीतीने नरेंद्र मोदी तटबंदीत राहत आहेत. १७७१ साली महादजी शिंदे यांनी दिल्लीवर आक्रमण केले होते. मराठी सैन्य आपल्यावर आक्रमण करेल, या भीतीने अफगाणिस्थानातून आलेल्या नजीब खान याने देखील अशीच तटबंदी उभारली होती. मला नरेंद्र मोदींमध्ये हाच नजीब खान दिसतो, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
COMMENTS