दिल्ली – भाजपचे भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा आज राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी दिल्लीत जाऊन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे.
नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. स्वपक्षाच्या धोरणांवर त्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती.शेतकरी प्रश्नावरुन त्यांनी अनेकवेळा सरकारविरोधी भूमिका घेतली होती. नुकतंच भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनासाठी नाना पटोले यांनी सिन्हांना हाक दिली होती.
आपण राजीनाम देणार असल्याचं यापूर्वीही त्यांनी बोलून दाखवलं होतं परंतु आज अखेर त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता.राज्यात आणि देशात भाजपची सत्ता असूनही नाना पटोले यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे
शेतकरी, शेतमजूर, ओबीसी वर्गाबाबत, छोट्या व्यापाऱ्यांच्या विरोधात असलेली भाजपा सरकार. या सरकारला शेतकऱ्यांच्या धोरणांवर काही घेणे देणे नाही,मी वारंवार शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले तरी सुद्धा या शेतकरी विरोधी सरकारला जाग आली नाही म्हणून मी राजीनामा चा निर्णय घेतला.
— Nana Patole (@NANA_PATOLE) December 8, 2017
COMMENTS