नवी दिल्ली – खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपला रामराम ठोकणा-या नाना पटोलेंची अखेर घरवापसी झाली आहे. त्यांनी गुरुवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, संजय निरुपम हे देखील उपस्थित होते. भाजप सोडल्यानंतर नाना पटोलेंची पुढील वाटचाल काय असणार याबाबत गेली अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. परंतु या चर्चेला गुरुवारी पूर्णविराम मिळाला असून नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवरुन गेली अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी अनेकवेळा बोचरी टीका केली होती.
काँग्रेस सोडल्यानंतर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पटोले खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने ते पक्षावर नाराज होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, नरेंद्र मोदींची कार्यशैली यावरुन त्यांनी सरकारवर जाहीरपणे टीका केली होती. मी जनतेच्या आशीर्वादाने खासदार झालो असून मी दिल्लीत खुर्ची उबवायला आलो नव्हतो. पण हे सरकार स्वतः काम करत नाही आणि आम्हालाही करु देत नाही’, अशी जाहीर टीका त्यांनी त्यावेळी भाजपवर केली होती. नाना पटोले यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केल्यामुळे विदर्भात काँग्रेसची ताकद वाढत असल्याचं बोललं जात आहे. पटोलेंच्या येण्यामुळे काँग्रेसला कितपत यश मिळणार हे पुढील काळात दिसणार आहे.
COMMENTS