…तर रावसाहेब दानवेंची खूर्ची गेली असती – नाना पटोले

…तर रावसाहेब दानवेंची खूर्ची गेली असती – नाना पटोले

नागपूर – भाजप सरकारच्या धोरणांवर अनेक दिवसांपासून नाराज असलेले आणि वेळोवेळी भाजप सरकारवर टीका करणारे भाजप खासदार नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वीच खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र सोडलं. नाना पटोलेंच्या टीकेनंतर रावसाहेब दानवेंनी नाना पटोलेंवर टीका केली. काँग्रेसमधून आले आणि आता पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार ही त्यांची जुनी सवय असून मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठीचा त्यांचा हा राजीनामा फंडा असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. त्यानंतर दानवे यांनी केलेली टीका अपेक्षितच होती ते जर असं बोलले नसते तर त्यांची खूर्ची गेली असती असं खोचक उत्तर त्यावेळी नाना पटोलेंनी दिलं. नागपूरमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार टीका केली. पापाच्या व्यवस्थेतून बाहेर पडायचे होते म्हणून राजीनामा दिला असून मोदींचा खोटारडेपणा उघडकीस आणणार असल्याचं त्यावेळी ते म्हणालेत.एका बैठकीत जेव्हा काही खासदारांनी शेती प्रश्नावर मोदींसमोर काही मुद्दे मांडले तेव्हा वयाने मोठ्या असणा-या खासदारांना त्यांनी खडसावून खाली बसवले. तसेच प्रस्तावित ओबीसी मंत्रालयासंदर्भातल्या बैठकीतही माझ्या आग्रहाला त्यांनी टाळले आणि असे मंत्रालय प्रशासकीय खर्च वाढवेल असे म्हणत त्यांनी माझी बोळवन केली. तसेच त्या बैठकीत मोदींनी भजापच्या कोणकोणत्या नेत्यांना खडसावले होते हे उघड केले तर अनेकांच्या खूर्च्या जातील असंही पटोलेंनी त्यावेळी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर खोचक उत्तर

तसेच राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी माझ्या वाटेला जाऊ नका असं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता तो आमच्यातला विषय असून याबाबत मला आणि मुख्यमंत्र्यांनाच माहित आहे. ते समजून घेतील असं खोचक उत्तर त्यावेळी पटोलेंनी दिलं.

COMMENTS