मुंबई : इंधन दरवाढीचा विरोध करत मोदी सरकार सत्तेत आले. पण याच सरकारने सर्वात जास्त इंधन दरवाढ करून देशातील जनतेची थट्टा केली. अशी टिका करीत आज महाराष्ट्र काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. आज राज्यपालांचे अभिभाषण आहे.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेसचे सर्व मंत्री, आमदार आणि नेते आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमला. यावेळी त्यांच्या हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक होते. त्यावर, ‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असा मजकूर लिहिलेला होता.
यावेळी काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर सायकलवरून विधानभवनाच्या दिशेने प्रवास सुरू केला. यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, धीरज देशमुख यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते.
COMMENTS