हायकमांडची नाना पटोलेंच्या नावावर सहमंती

हायकमांडची नाना पटोलेंच्या नावावर सहमंती

नवी दिल्ली : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद आणि काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते पद अशी तीन पदे आहेत. एका व्यक्तीकडे एकच पद असावे, असा पक्षात एक गट असल्याने प्रदेशाध्यक्ष बदलण्यात यावा, अशी मागणी करीत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून प्रदेशाध्यक्षपद बदलाची प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी अनेक नावे शर्यतीमध्ये आहेत. पण महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांच्या नावावर हायकमांडने अंतिम शिक्कामोर्तब केल्याची सूत्रांची माहिती आहे.

सध्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांचीही नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांच्या पुनरागमनाची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राहूल गांधींचे निकटवर्ती खासदार राजीव सातव यांना दिल्लीतून सोडण्यास हायकमांडने नकार दिला आहे. विजय वडेट्टीवार यांच्याबाबतही काँग्रेसमधला एक वरिष्ठ नेत्याचा गट सक्रिय होता. मात्र या दोघांऐवजी नाना पटोले यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

नाना पटोले यांच्या निवडीमुळे विधानसभा अध्यक्ष बदलाचा ही प्रश्न आहे. त्याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतही चर्चा केल्याचं समजत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून कोणाची निवड होणार याची ही चर्चा सुरु होईल. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची निवड होण्याची शक्यता आहे. येत्या दोन- तीन दिवसात ही निवड जाहीर होण्याची शक्यता आहे.

COMMENTS