नारायण राणेंच्या आत्मचरित्रात मोठा गौप्यस्फोट ?

नारायण राणेंच्या आत्मचरित्रात मोठा गौप्यस्फोट ?

मुंबई – महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे हे आपलं आत्मचरित्र लिहित असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. याबाबत नितेश राणे यांनी ट्वीट केलं असून माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसेच या ट्वीटमध्ये त्यांनी अब आएगा मजा, सबका हिसाब होगा, असंही म्हटलं आहे. त्यामुळे नारायण राणे हे आपल्या आत्मचरीत्रात काय गौप्यस्फोट करणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

दरम्यान नारायण राणे हे आपल्या आत्मचरित्रात अनेक मोठ्या लोकांची पोलखोल करतील असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच त्यांचा राजकीय प्रवासाबाबतही ते अधिक माहिती देतील असं बोललं जात आहे. राणे यांच्या राजकीय कारकिर्दीला शिवसेनेतून सुरुवात झाली. त्यांनी युतीचे सरकार असताना मुख्यमंत्रीपद भूषवले होते. आघाडीची सत्ता असताना त्यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१७ मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नवीन पक्षाची स्थापना केली. यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर रिंगणात उतरले असून सध्या ते राज्यसभेत खासदार आहे. भाजपाच्या पाठिंब्यावर ते राज्यसभेत गेले आहेत. त्यामुळे त्यांचा हा सर्व राजकीय प्रवास या आत्मचरित्रात वाचायला मिळणार आहे. तसेच शिवसेनेबाबत ते आत्मचरीत्रात काय लिहिणार, आत्मचरीत्रात मोठ्या नेत्यांबाबत काही गौप्यस्फोट करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

COMMENTS